राज्य युवा प्रशिक्षण केंद्राच्या वतीने १० दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन
महाराष्ट्र राज्याचे युवा धोरण-२०१२ दि. १४ जून, २०१२ च्या शासन निर्णयान्वये जाहिर करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने राज्यातील युवक कल्याण क्षेत्रात परिणामकारक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने युवकांमधील नेतृत्व गुणांचा व व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवून आणण्याकरिता त्यांना प्रशिक्षण देण्याच्या योजनेस शासनाने मान्यता दिलेली असून त्याकरिता शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे- बालेवाडी या ठिकाणी राज्य युवा प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली आहे.
या प्रशिक्षण केंद्राच्या वतीने युवकांच्या सक्षमीकरणासाठी विविध तज्ञ व्यक्तींच्या सहाय्याने दि. १० मार्च ते १९ मार्च, २०१५ या कालावधीत १० दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण शिबीरांमध्ये २२ ते २९ वर्षे वयोगटातील युवकांना विविध जीवन कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या शिबीराकरिता प्रत्येक जिल्ह्यातून दोन युवक व एक युवती यांची निवड केली जाणार आहे.
या शिबीरामध्ये वयाची अट पूर्ण करणारे नेहरु युवा कर्मी (NYC), राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) २ कॅम्प पूर्ण केलेले विद्यार्थी, राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी (NCC), एम. ए. (सायकॉलॉजी, सोशियॉलॉजी ) चे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, नोंदणीकृत युवा मंडळे यांच्याकडून सामाजिक कार्यात रस घेणारे युवक युवती सहभागी होऊ शकतात.
प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर शासनाचे प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. प्रशिक्षण केंद्रांतर्गत होणा-या आगामी प्रशिक्षण शिबीरांकरिता सहभागी होण्यास इच्छूक युवक युवतींनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा या ठिकाणी प्रत्यक्ष अथवा ०२१६२-२२३७४३८ या दुरध्वनीद्वारे संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment