Friday 25 April 2014

सातारा जिल्हास्तर मैदानी निवड चाचणी

सातारा जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्यावतीने जिल्हास्तर मैदानी निवड चाचणी आयोजन श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे करण्यात आलेले असून, यामधून राज्यस्तर मैदानी क्रीडा स्पर्धेकरिता संघ निवडला जाणार आहे. तरी जिल्हास्तर मैदानी निवड चाचणीमध्ये जास्तीत जास्त विद्यालय / महाविद्यालयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. यशवंत घोरपडे, सचिव, सातारा जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असो. सातारा यांनी केलेले आहे. 
निवड चाचणीचा कार्यक्रम खालील प्रमाणे :
१. दिनांक २८ एप्रिल २०१४ :-१८, २० वर्षाखालील मुले व मुली, व पुरुष व महिला (open group)
२. दिनांक २९ एप्रिल २०१४ :- १४ व १६ वर्षाखालील मुले व मुली

 टिप : खेळाडूंनी येताना वयाचा दाखला घेऊन येणे आवश्यक आहे.

Saturday 5 April 2014

राष्ट्रीय युवा दिन व युवा सप्ताह उत्साहात साजरा

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा व विविध संस्थेच्या वतीने राष्ट्रीय युवा दिन व युवा सप्ताह साजरा करण्यात आला. राष्ट्रीय युवा दिन व युवा सप्ताहाचे उद्‍घाटन मा. श्री. उदय जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्‍न झाले. या प्रसंगी श्री. अनुप शिंदे, उद्योगपती, श्री. तानाजी मोरे, क्रीडा अधिकारी, श्रीमती मनिषा पाटील, क्रीडा अधिकारी व श्री. अभय चव्हाण, क्रीडा मार्गदर्शक आदी उपस्थित होते.
            युवा महोत्सवाचे उद्‍घाटन झाल्यानंतर स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन करुन, मिरवणूक काढण्यात आली. ही रॅली राजवाडा चौक येथुन सुरु होऊन पोवई नाका मार्गे लेझीम, ढोल यांच्या तालात श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी सांगता झाली.
            युवा महोत्सवांतर्गत युवक-युवतींसाठी कार्यशाळा, निबंध, वत्कृत्व, पाककला, रांगोळी, लोकगीत, लोकनृत्य, चित्रकला, भिंतीपत्रके, क्रीडा स्पर्धा, मॅरेथॉन आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते. स्वातंत्र्य लढ्यातील युवकांचे कार्य, राष्ट्रीय प्रगतीवर युवकांचे कार्य, राष्ट्रीय एकात्मता आदी चर्चासत्र घडवून आणली. राष्ट्रपर समूह गायन स्पर्धा, आरोग्य शिबीर, नेत्रदान शिबीर यावर डॉ. पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले होते.

            युवा महोत्सवाचा समारोप समारंभ श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे संपन्‍न झाला. या समारंभामध्ये विविध स्पर्धेमधिल विजेत्यांना मेडल, रोख पारितोषिके देण्यात आली.


Tuesday 1 April 2014

महाराष्ट्र थ्रोबॉल असोसिएशन,नागपूर कडून बनावट कागदपत्रे सादर करुन शासनाची फसवणूक केल्याबाबत..

महाराष्ट्र थ्रोबॉल असोसिएशन,नागपूर कडून बनावट कागदपत्रे सादर करुन शासनाची फसवणूक केल्याबाबत..

            राज्य शासनाच्या क्रीडा युवक सेवा संचालनालयाच्या वतीने विविध संघटनांच्या विविध प्राविण्यप्राप्त खेळाडूंच्या प्रमाणपत्रांची पडताळणी 5 टक्के आरक्षणांतर्गत करण्यात येते.
            तसेच संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्य स्पर्धांत सहभागी तसेच प्राविण्यप्राप्त  खेळाडूंना 10 वी 12 वी मधील विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देण्यात येतात. महाराष्ट्र थ्रोबॉल असोसिएशन नागपूर यांनी क्रीडा युवक सेवा संचालनालयास सन 2008-09 या वर्षामध्ये खुल्या गटातील प्राविण्यप्राप्त सहभागी खेळाडूंची यादी ग्रेस गुणाकरीता सादर केली.  तसेच सदर संघटनेने 5 टक्के आरक्षणांतर्गत सन 2008-09 मधील स्पर्धेच्या खुल्या गटाची यादी संचालनायलाकडे सादर केली.  5 टक्के आरक्षांतर्गत प्राप्त प्रस्तावांची पडताळणी करीत असताना एकाच स्पर्धेच्या दोन वेगवेगळया यादया महाराष्ट्र थ्रोबॉल संघटनेने संचालनालयास सादर केल्याचे निदर्शनास आले आहे.  त्यामुळे महाराष्ट्र थ्रोबॉल असोसिएशन, नागपूर यांनी बनावट यादी संचालनालयास सादर करुन शासनाची फसवणुक केली असल्याने राज्य शासनाने महाराष्ट्र थ्रोबॉल असोसिएशन, नागपूर यांचेवर खालील प्रमाणे कार्यवाही करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
·         महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेमार्फत महाराष्ट्र थ्रोबॉल असोसिएशन, नागपूर यांना देण्यात आलेली मान्यता रद्द करण्यात येत आहे.
·         महाराष्ट्र क्रीडा परिषदेमार्फत देण्यात येणारे सर्व प्रकारचे अनुदान या संघटनेला बंद करण्यात येत आहे.
·         शासकीय व निमशासकीय नोकरीमध्ये खेळाडूंसाठी असणारे 5 टक्के आरक्षण थ्रोबॉल या क्रीडा प्रकारासाठी रद्द करण्यात येत आहेत.
·          इयत्ता 10 12 वी मधील थ्रोबॉल या खेळासाठी 25 ग्रेस गुणांची सवलत रद्द करण्यात येत आहे.

·         या संघटनेकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या सर्व कागदपत्रांची व संघटनेच्या संपूर्ण कारभाराची क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत चौकशी करण्यात येत आहे.