Tuesday 24 February 2015

इ. १० वी व १२ च्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे २५ गुण मिळण्याकरिता जिल्हा क्रीडा संघटनांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत...

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षेस प्रविष्ठ होणारे राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेले  खेळाडू विद्यार्थी परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास, त्यांना उत्तीर्ण होण्याच्या किमान मर्यादेपर्यंत क्रीडा सवलतीचे वाढीव २५ गुण केवळ उत्तीर्ण होण्यासाठी देण्याबाबत शासनाने मान्यता प्रदान केलेली आहे.
            सन २०१4-१5 या वर्षात एकविध खेळांच्या अधिकृत राज्य संघटनांनी आयोजित केलेल्या राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणारे व प्राविण्य संपादन करणारे इ. १० व इ. १२ वीचे खेळाडू विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्यांना उत्तीर्ण होण्यासाठी सवलतीचे वाढीव २५ गुण अनुज्ञेय राहतील.
            सदर वाढीव गुणांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी आपल्या संघटनेच्या अधिकृततेबाबतची खालील कागदपत्रे या कार्यालयास सादर करावीत.
१.     जिल्हा संघटनेचे संस्था नोंदणी अधिनियम, १८६० व मुंबई सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, १९५० अन्वये नोंदणी केलेल्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित केलेल्या प्रती.
२.     जिल्हा संघटनेच्या घटनेची साक्षांकित प्रत.
३.     राज्य संघटनेस जिल्हा संघटना संलग्न राज्य संघटनेचे पत्र.
४.     राज्य, राष्ट्रीय़, आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे परिपत्रक.
५.     राज्य, राष्ट्रीय़, आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंच्या प्रवेशिका.
६.     राज्य, राष्ट्रीय़, आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांची भाग्यपत्रिका.
७.     राज्य, राष्ट्रीय़, आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे गुणपत्रक. (सांघिक खेळ)
८.     राज्य, राष्ट्रीय़, आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचा वजनगटनिहाय वजन घेतलेबाबत खेळाडूंची स्वाक्षरी असलेला तक्ता व भाग्यपत्रिका.(वैयक्तिक खेळ)
९.     राज्य, राष्ट्रीय़, आंतरराष्ट्रीय स्तरावरील अथलेटिक्स व जलतरण स्पर्धांचा बाबनिहाय कार्यक्रम. 
१०. राज्य, राष्ट्रीय़, आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे अंतिम निकालपत्र.
११. राज्य, राष्ट्रीय़, आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांत सहभागी झालेल्या खेळाडूंच्या साक्षांकित याद्या विहीत नमुन्यात दोन प्रती.
१२. राज्य संघटनेचे अध्यक्ष व सचिव यांची नावे व त्यांच्या स्वाक्षरीच्या नमुन्याचे पत्र.
      वरील सर्व कागदपत्रांची पूर्तता या कार्यालयाकडॆ करण्यात यावी. परिपूर्ण कागदपत्रांसह सादर केलेला प्रस्ताव क्रीडा गुण सवलतीच्या कार्यवाहीसाठी विचारात घेण्यात येईल. संघटनेकडून प्रस्ताव प्राप्त न झाल्यास अथवा प्रस्तावातील  वर नमूद केलेली कागदपत्रे अपूर्ण राहिल्याने संबंधित खेळाच्या विद्यार्थ्यांना वाढीव गुण न मिळाल्यास त्यास जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जबाबदार राहणार नाही. विद्यार्थ्यांच्या होणा-या नुकसानीस पूर्णपणे संबंधित संघटना जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.


                                                                                         

                                                                                                                 

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षेस प्रविष्ठ होणा-या राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत....

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षेस प्रविष्ठ होणा-या राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांचे सवलतीचे वाढीव गुण मिळण्यासाठीचे प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. प्रस्ताव सादर करताना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने दिलेला विहीत नमुन्यातील अर्ज, खेळाडूचे प्रमाणपत्र व हॉल तिकीटाची सत्यप्रत मुख्याध्यापकांच्या सही व शिक्क्यासह संबंधित शाळेमार्फत दि. २० मार्च २०१5 पूर्वी सादर करणे बंधनकारक आहे. शासकीय स्पर्धा (शालेय, महिला व ग्रामीण) स्पर्धा तसेच मान्यताप्राप्त संघटनेच्या खेळांचे प्रस्ताव स्वतंत्र सादर करावेत.
  अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावाशालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दि. ३० नोव्हेंबर २०११ च्या शासन निर्णयानुसार गतवर्षापासून उपरोक्त परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास, त्यांना उत्तीर्ण होण्याच्या किमान मर्यादेपर्यंत क्रीडा सवलतीचे वाढीव २५ गुण केवळ उत्तीर्ण होण्यासाठी देण्यात येतील. क्रीडा व युवक सेवा संचालनालय व महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या अटींच्या अधीन राहून क्रीडा सवलतीचे वाढीव गुण अनुज्ञेय राहतील याची सर्व शाळाप्रमुख, शारीरिक शिक्षण शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनी नोंद घ्यावी. 

Saturday 7 February 2015

युवकांकरिता नेतृत्वगुण विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबीराचे आयोजन.

राज्य युवा प्रशिक्षण केंद्राच्या वतीने १० दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

महाराष्ट्र राज्याचे युवा धोरण-२०१२ दि. १४ जून, २०१२ च्या शासन निर्णयान्वये जाहिर करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने राज्यातील युवक कल्याण क्षेत्रात परिणामकारक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने युवकांमधील नेतृत्व गुणांचा व व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवून आणण्याकरिता त्यांना प्रशिक्षण देण्याच्या योजनेस शासनाने मान्यता दिलेली असून त्याकरिता शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे- बालेवाडी या ठिकाणी राज्य युवा प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली आहे.
या प्रशिक्षण केंद्राच्या वतीने युवकांच्या सक्षमीकरणासाठी विविध तज्ञ व्यक्तींच्या सहाय्याने दि. १० मार्च ते १९ मार्च, २०१५ या कालावधीत १० दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन करण्यात आले  आहे. या प्रशिक्षण शिबीरांमध्ये २२ ते २९ वर्षे वयोगटातील युवकांना विविध जीवन कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या शिबीराकरिता प्रत्येक जिल्ह्यातून दोन युवक व एक युवती यांची निवड केली जाणार आहे.
या शिबीरामध्ये वयाची अट पूर्ण करणारे नेहरु युवा कर्मी (NYC), राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS)  २ कॅम्प पूर्ण केलेले विद्यार्थी,  राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी (NCC), एम. ए. (सायकॉलॉजी, सोशियॉलॉजी ) चे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, नोंदणीकृत युवा मंडळे यांच्याकडून सामाजिक कार्यात रस घेणारे युवक युवती  सहभागी होऊ शकतात.

प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर शासनाचे प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. प्रशिक्षण केंद्रांतर्गत होणा-या आगामी प्रशिक्षण शिबीरांकरिता सहभागी होण्यास इच्छूक युवक युवतींनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा या ठिकाणी प्रत्यक्ष अथवा ०२१६२-२२३७४३८ या दुरध्वनीद्वारे संपर्क साधावा.